Ad will apear here
Next
कल्पनातीत कामगिरी करणारी ‘कल्पना’
१६व्या वर्षी ‘दोन रुपये रोज’ उत्पन्नाने सुरुवात करून, चाळिशीत अब्जावधी रुपयांची आणि मुंबई शहरात अनेक प्रकारच्या स्थावर-जंगम मालमत्तेची मालकीण झालेल्या स्त्रीची ही कथा आहे. विश्वास ठेवता न येण्याजोग्या या सत्यकथेची नायिका आहे कल्पना सरोज.  ‘नवरत्ने’ मालिकेत आज त्यांच्याबद्दल...
.........
हिंदी चित्रपटात शोभावी अशीच ही कथा. मी तरी हे असे घडताना फक्त आणि फक्त चित्रपटातच बघितले आहे. १६व्या वर्षी ‘दोन रुपये रोज’ उत्पन्नाने सुरुवात करून चाळिशीत अब्जावधी रुपयांची आणि मुंबई शहरात अनेक प्रकारच्या स्थावर-जंगम मालमत्तेची मालकीण झालेल्या स्त्रीची ही कथा आहे. विश्वास ठेवता न येण्याजोग्या या सत्यकथेची नायिका आहे कल्पना सरोज.

विदर्भातील रोपारखेडा गावी वडिलांची अल्प वेतनाची सरकारी नोकरी. दोन भाऊ आणि तीन बहिणींमधील थोरली कल्पना... १२व्या वर्षी लग्न करून मुंबईला... १३व्या वर्षी अतोनात हालअपेष्टा सहन करून काडीमोड घेऊन परत गावी.... सामाजिक निर्भर्त्सनेतून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न.... १६व्या वर्षी निर्धाराने पुन्हा एकदा मुंबई.... आणि मग ‘विनाथांबा’ मुंबईच.

१६ वर्षांच्या कल्पनाने तयार कपड्यांच्या एका कारखान्यात दोन रुपये रोजावर काम करण्यास सुरुवात केली. वडिलांची नोकरी गेल्याने आर्थिक भार तिच्यावर येऊन पडला आणि अधिक पैसे कमावणे अत्यावश्यक होऊन बसले. अनुसूचित जाती-जमातींना मिळणाऱ्या सवलतींअंतर्गत कल्पनाने कर्ज घेऊन शिलाई मशीन्स विकत घेतली आणि घरच्या घरी कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यात थोडा जम बसल्यावर पुन्हा एकदा कर्ज घेऊन कल्पनाने लाकडी वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुन्हा एकदा लग्न करून संसारही थाटला. असाच कुठलासा वादग्रस्त जमिनीचा तुकडा स्वस्तात विक्रीला निघाला होता, तो हिने विकत घेतला. त्यावरचे सगळे वाद कायदेशीररीत्या मिटवले आणि मग एका व्यावसायिक कंत्राटदाराकडून तिथे इमारत बांधून घेतली. त्यात तिला पाच कोटी रुपयांचा फायदा झाला. आणि इथेच तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. हा मिळालेला सगळा पैसा तिने बांधकाम व्यवसायात गुंतवला. आणि अधिकाधिक नफा कमावू लागली. तिने धडाडीने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आणि यश पदरात पाडून घेतले. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ती नवऱ्याचा स्टीलच्या वस्तूंचा कारखानाही सांभाळू लागली. 

असे करता करता एक दिवस ‘कमानी ट्यूब्ज व कमानी इंजिनीअरिंग’ ही ब्रास ट्यूब तयार करणारी डबघाईला आलेली कंपनी विकत घेण्याचा प्रस्ताव तिच्याकडे आला. विचाराअंती कंपनी तर तिने विकत घेतलीच; पण या कंपनीवर असंख्य न्यायालयीन दावे होते, ते सहा वर्षे कोर्टाच्या चकरा मारून तिने मिटवले आणि कंपनीचा संपूर्ण ताबा घेतला. पुढे सगळी कर्जे फेडली. थकलेली देणी दिली. बंद पडलेली कंपनी उत्तम नफा कमवू लागली. आणि दोन रुपये कमवणारी कल्पना अब्जाधीश झाली. 

...पण हे काही रातोरात घडलेले नाही. त्यामागे तिची प्रचंड मेहनत, जिद्द आणि धडाडी आहे, हे दिसतेच. दोनाचे दोन हजार झाल्यावर ती थांबली नाही, तर आपले आकाश आपण ठरवत गेली. पुढे पुढे झेप घेत गेली. कुठलाही आधार, व्यावसायिक शिक्षणच काय, पण पूर्ण शालेय शिक्षणसुद्धा जिला मिळाले नाही, तिने अंगमेहनतीने आणि धोरणीपणाने परिस्थितीवर मात केली आणि स्वतःची एक वेगळी ओळख बनवली. 

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय महिला बँकेच्या त्या पहिल्या मराठी संचालिका आहेत. तसेच केंद्र सरकारने उद्योग जगतातील त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल ‘पद्मश्री’ हा सन्मान देऊनही त्यांना गौरविले आहे. 

शारीरिक-मानसिक घाव आणि निरनिराळे अन्याय सहन करत, आहे त्याच परिस्थितीत राहणाऱ्या अनेक महिला आपण रोजच आपल्या आजूबाजूला बघतो. अशी एखादीच ‘कल्पना’ असते, जी कल्पनेच्याही पलीकडची विजयश्री खेचून आणून आपल्या नशिबालाही लाजवते. 

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZQRBT
Similar Posts
कर्तृत्ववान महाराणी गायत्रीदेवी अत्यंत सुंदर, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि उत्तम कर्तृत्व यांचा मिलाफ महाराणी गायत्रीदेवींच्या व्यक्तिमत्त्वात होता. वेगवेगळ्या प्रकारच्या चारचाकी गाड्या चालवण्यापासून पोलो खेळापर्यंत आणि शिकारीपासून घोडेस्वारीपर्यंत असे त्यांचे वैविध्यपूर्ण छंद होते. संस्थानांच्या विलिनीकरणानंतर महाराणी हे बिरुद मिरवून
लेखणीची शक्ती दाखविणाऱ्या काशीबाई पूर्वी विविध प्रकारच्या बंधनांमुळे केवळ ‘चूल आणि मूल’ यांतच अडकून पडावे लागलेल्या स्त्रियांनी आज आपल्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रौत्सव आजपासून सुरू होतो आहे. ते औचित्य साधून आम्ही घेऊन येत आहोत ‘नवरत्न’ नावाची लेखमालिका. पूर्वीच्या काळी अनेक बंधने
पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे पतिनिधनानंतर ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र बंद पडू न देता ते स्वतः अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवून तानुबाई बिर्जे यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांचं कर्तृत्व सिद्ध केलं. ‘नवरत्ने’ मालिकेत आज माहिती घेऊ या पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे यांच्याबद्दल...
बहुपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कमलादेवी चट्टोपाध्याय स्वातंत्र्याच्या चळवळीतील सहभाग, पारंपरिक कलांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न, लेखन, सामाजिक कार्य या आणि अशा विविध क्षेत्रांत कार्य केलेलं बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय. ‘नवरत्ने’ मालिकेत आज त्यांच्याबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language